Saturday, November 7, 2009

एकदा मी हरवलो तेव्हा!!!

(This was an essay written by me which was published in the annual magazine of my college. Our marathi professor Mrs. Bal approached me and she herself insisted me to make some minor changes in the essay and give it for publishing. It is all imaginary and I have never been to that place anytime!!!)


'Railway Station' पाहून मला अत्यानंद झाला.मी भराभर चालत स्टेशनमधे शिरलो. तो रिकामा platform पाहून मी पुरता फसल्याची मला खात्री पटली व मी अधीर होऊन इकडे-तिकडे नजर फिरवली.

‘स्टेशन मास्तर कार्यालय’ हा हिंदीतला बोर्ड वाचून मी आत शिरलो.

" Yes, What can I do for you?" तो त्याच्या वाकड्या तिकड्या इंग्लिशमधे म्हणाला.

"Can yo tell me where is the lost and found department?" मी बडबडलो, तेही धापा टाकतच. मी काय बोललो ते मलाच कळलं नाही; पण तोंडातल्या तोंडात बोललेले ते शब्द त्या खुर्चीवरच्या लंबकर्णाच्या कानावर आदळलेच.

"Go to the right and first right turn." तो पचकन थुंकून मग पचकला.

"Thanks" एवढं म्हणून बाहेर पडलो व सांगितलेल्या ठिकाणी गेलो.

नशीब आणि योगयोग म्हणजे तिथला मुकादम मराठी होता.बिल्ला वाचून नाव कळलं आणि हायसं वाटलं.

"Yes......" तो पाणी पीत पीत म्हणाला.

"मला एक complaint लिहायची आहे."

त्याने चमकून वर बघितलं. त्याचा चेहरा उजळला. त्याने बाटली टेबलावर ठेवली.

"काय हरवलंय?"

"मी"

"काय? अहो तुम्ही शुद्धीवर आहात ना?" त्याने पाण्याच्या बाटलीला पुन्हा हात घातला.

मग मी त्याला सगळी हकीकत सांगितली, तीच सांगतो.

मी त्या शहरात, नाही गावात हरवलो होतो. माझ्या प्रवासमित्राबरोबर(म्हणजे प्रवासात भेटलेल्या एका माणसाबरोबर) मी इथे उतरलो; पण तो मला फसवून निघून गेला आणि मीही तितक्याच सहजतेने अडकलो. त्यात मी होतो परप्रांतात. कर्नाटक व केरळ राज्यांच्या सीमेवरचं ते एक रेल्वे स्टेशन असलेलं छोटंसं गाव होतं.

’श्री. के. त्यागराजन’, हे नाव मी जन्मात विसरणार नाही. हाच तो भामटा, रेल्वेत भेटलेला. दिवसभर सोबत म्हणून मैत्री जमली;पण आता मला तो दिसला की तो खतम!

मी माझ्या कंपनीच्या कामासाठी अर्जंट म्हणून घाईघाईत एर्नाकुलमला निघालो होतो.तिथला पत्ता माहीत नव्हता;पण फोन नंबर माझ्या मोबाईलमधे होता. "मी फोन करून कळवलंय तिथे. स्टेशनवर तुला घ्यायला माणूस येईल." या साहेबांच्या भरवशावर निघालो. घाईघाईत चार्जर घरीच राहिला व मोबाईलही प्रामाणिकपणे दिवसभर जागा राहून मग झोपला!!! सगळे contacts गुल............मग या भल्या(?????) माणसाने धीर दिला,स्वतःचा मोबाईलही दिला; पण चार्जर नाही मिळाला. ठीक आहे फोन तर केला घरी नंबर आठवून.(बुडत्याला काडीचा आधार!)

आमची गाडी त्या स्टेशनवर अचानक थांबली.काय झालंय बघायला साहेब खाली उतरले. तो परत आला तो बडबडतच. म्हणाला की पुढे मालगाडी रुळांवरून घसरली आहे. निदान चार-पाच तास तरी लागतील. मला एर्नाकुलमच्या officeला फोन करून कळवायचं होतं. चमत्कार म्हणजे नंबर आठवला; पण मोबाईल मागितल्यावर कळलं की त्याच्याही मोबाईलने राम म्हटला होता.(खोटारडा कुठला!!!!!) तो जरा जास्तच त्रासल्यासारखा वाटला. मग अचानक म्हणाला की इथे चार्जर विकत मिळेल का? आणि मग आम्ही दोघे त्या गावात मोबाईलचं दुकान शोधायला बाहेर पडलो.

त्या एवढ्याशा गावात जिथे रेल्वे स्टेशनची दुरवस्था तिथे मोबाईलचं दुकान कुठलं असणार? पण हा विचार तेव्हा डोक्यात आला नाही. सामान बरोबर घ्यायचा विचार आला होता मनात; पण खिडकीशी आलेल्या कावळ्याला उडवून लावतो तसा मी तो सहजपणे उडवून लावला. (गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना ते असं होतं)

आमच्या शोधमोहिमेला काही यश आलं नाही. परत येताना रस्त्यात साहेबांना लघुशंका आली व त्यासाठी ते आडोशाला गेले आणि मग गायबच. थोड्यावेळाने बघायला गेलो तर........मग मला मोठी शंका आली. स्टेशनमधे जाऊन बघतो तर माझं सामान नव्हतं गाडीत जागेवर.

आता हताशपणे बसून दातओठ खाण्याशिवाय मी काय करणार होतो? ( पण म्हटलं कशाला आपलेच दात आणि आपलेच ओठ,उगाच चावून रक्त कशाला काढायचं?) त्याऐवजी वेळ होता म्हणून म्हटलं शोधावं त्या चोराला, आणि मी निघालो त्याला शोधायला एकटा. ( आता हा असाच विचार माझ्या मनात तेव्हा का आला माहीत नाही.कदाचित ’विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणून असेल!!!) त्या अनोळखी भागात त्याला शोधता शोधता मी जंगलात कधी आलो कळलंच नाही. कसा आलो तेही आठवत नव्हतं. डोक्याला टेन्शन!!!!

मग ते टेन्शन घालवण्यासाठी मी नेहमीप्रमाणे गाणी म्हणू लागलो. बेसूर तर बेसूर गाणं तर होतं. (रेडिओ मिर्चीवाल्यांना दिसलो असतो तर तिथल्यातिथेच शूटिंग करून,‘मिर्ची सुननेवाले always खुश’ म्हणत मला पडद्यावर आणलं असतं!!!!!) तिथल्या लाल मातीच्या धुळीने मी मातीत लोळल्यासारखा रंगलो होतो. मग आधी ती सगळी धूळ झटकली. हा त्यागराजन काही सापडणार नव्हता. आता तर मला बाहेर पडायची घाई झाली होती. (शिवाय तो काय जनावर होता का जंगलात सापडायला!) म्हणतात ना खूप चांगली आणि खूप वाईट माणसं दिवसा कंदील घेऊन शोधलं तरी सापडणं महामुश्किल. चालत राहिलो,गाणंही होतंच. किती वेळ गेला कळलंच नाही. घड्याळही सामानाबरोबर गेलं होतं.

अचानक समोरच्या झाडावरचं माकड ओरडायला लागलं. मी गाणं थांबवलं. "कदाचित गाण्याचा त्रास होत असेल. काय दिवस आले आहेत! आजकाल माकडांनाही संगीत कळतं" मी स्वतःशीच पुटपुटलो. तरीही ते ओरडतंच राहिलं. ते घाबरून ओरडत होतं. मला कळेना की या जंगलात हरवलेला एक गरीब बिचारा माणूस याला हिंस्र कसा वाटला? मग मीही थोडा घाबरलो. तेवढ्यात मला मागून घोड्याच्या टापांसारखा आवाज आला. बघतो तर ‘डुक्कर’...................................... पण रानातलं.

ती रानडुकरीण डोळ्यांत निखारे घेऊन माझ्याकडे बघत धावत येत होती.कदाचित माझा तिच्या रानातला ‘पादक्षेप’(’पाय टाकणे’ हो) तिला पसंत नसेल.ती एखाद्या मारक्या बैलासारखी मागे लागली. माझा शर्ट तर निळा होता, असो तो तिला लाल वाटला असेल - शेवटी डुक्कर ना! मी मुद्दाम वेडावाकडा पळत तिला चकवत होतो,(आणि म्हणूनच मी वाचलो.) ती पिच्छा सोडतच नव्हती. मला तर झाडावरही चढता येत नव्हतं. बहुतेक ती आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी पळत होती.( आणि मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी!!!)

अरे, हे काय! माझी चप्पल तुटली. आता मेलो.........पण धीर करून ती तिलाच मारली. ती बावचळली पण पाठलाग चालूच. मगाचच्या माकडाच्या दर्शनाने माझ्या अंगात त्याचाच संचार झाला होता बहुतेक! वेडयासारखा पळालो. शेवटी एकदाचा तिने पाठलाग सोडला आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.

माझी अवस्था दयनीय झाली होती. दोन्ही पायात चपला नव्हत्या. कमरेचा पट्टा तुटल्यामुळे pant खाली घसरत होती. शर्ट अर्धवट इन केल्यासारखा बाहेर आला होता. काही बटणंही तुटून पडली होती. चेहरा घामाने डबडबला होता. केशरचनेची तर कधीच वाट लागली होती. त्यांवर धूळही चढली होती. त्यातच दुपार टळत आली होती. गाडी मिळवण्यासाठी मला लवकरात लवकर स्टेशन गाठायचं होतं.

काहीही न सुचल्याने मी सरळ चालत रहायचं ठरवलं. (साधा सरळ माणूस ना मी!) मी सरळ दिशेने चालत राहिलो, आणि दहा पंधरा मिनिटांत वस्ती दिसली. वस्तीत पोहोचलो आणि सगळे लोक माझं ‘सुंदर ते ध्यान’ पाहून हसू लागले. असं वाटत होतं की हे लोक खूप दिवसांनंतर हसतायत. शिवाय कारणही होतच तसं जबरदस्त!!!!! मग एका माणसाने मला जवळ बोलावलं व अगम्य असं काहीतरी बोलला. मला कळलं नाही. मी त्याला इंग्लिशमधे विचारलं की रेल्वे स्टेशन कुठे आहे. ते त्यालाही कळलं नाही. त्याचे शब्द मात्र मला शिव्यांसारखे वाटत होते. म्हणून मी त्याला मराठीतून शिव्या हासडल्या आणि पुढे निघालो.

संध्याकाळ होत आली होती. मी चिंतेत होतो. आणि अचानक लांबून स्टेशन दिसलं, रूळ दिसले. मी उडीच मारली आनंदाने. झपाझप चालत स्टेशनकडे आलो. पुढचं तर माहीतच आहे...

हे ऐकून तो मुकादम रडला. एकतर कितीतरी दिवसांनंतर तो मराठी माणसाशी बोलत होता, तेही अशा अवस्थेत. माझी रात्रीची जेवणाची व राहण्याची सोय झाली. स्टेशनातल्या फोनवरून एर्नाकुलमला फोन करून कळवलं की मला यायला उशीर होईल, मी एक दिवस नंतर येईन. त्यांचा पत्ताही घेतला. माझे कपडे नीट धुवून मिळाले. बूटही दुसरे दिले त्या मुकादमाने. सामानात महत्त्वाची कागदपत्रं नव्हती हे बरं झालं. ठरल्याप्रमाणे मग सकाळी त्याने स्वखर्चाने पुढच्या स्टेशनवरून पुढच्या ट्रेनने माझी रवानगी करून दिली. मी त्याचं नाव व पत्ता घ्यायला विसरलो नाही. निघताना त्याच्या डोळ्यांत पुन्हा पाणी होतं.

सुखरूप पोचलो आणि काम पूर्ण करून परतही आलो घरी - न हरवता. पण माझे कपडे, टूथब्रश, कंगवा, शेव्हिंग किट इ. सामान मात्र गेलं. तो चोर एकटा नव्हता हे मात्र नक्की. कोणीतरी चेन ओढून गाडी थांबवली होती म्हणजे नक्कीच दोघे - तिघे असणार. मला त्या चोरांची मात्र अजूनही दया येते, कीव वाटते. एवढं करून हाती काहीच लागलं नाही. असं नुकसान कधी झालं नसेल व ते सहन करताना नाकी एक्याऐंशी ( नऊ नव्हे त्याचा वर्ग.) आले की त्या त्यागराजनलाही माझी आठवण नक्की येईल.

मात्र त्या डुकरिणीचे मला आभार मानावेसे वाटतात. ती नसती तर कदाचित मी आज ‘आपण यांना पाहिलंत का?’ मधे असतो. खरंच ती मला लक्ष्मीचा अवतार वाटते.( हो कारण विष्णूचा अवतार ‘वराह’ होता, आणि ही तर मादी होती.) तिच्यामुळेच आज मी जिवंत आहे.

धन्य ती वराहमाता!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!